स्मरणातील दिवस – भाग१

*नेहरू स्टेडियम*
पुण्यात लहानाची मोठी झाले. जितकी वर्षे वयाला तितकी वर्षे पुण्यातील वास्तव्यास.
पुण्यात विविध स्पर्धांसाठी नावाजलेले पटांगण म्हणजे नेहरू स्टेडियम. नेहरू स्टेडियमवर क्रिकेट मॅचच होत असतात हा माझा लहानपणी गैरसमज होता.  कारण मोठी मुले- मुली मी सगळ्यात लहान असल्याने उन्हाळ्याच्या सुट्टीत क्रिकेट खेळायला जाताना मला कधीच नेत नसत.
पुढे मी शाळेत घोष पथकात सिलेक्ट झाले. लेझिम स्पर्धेसाठी सिलेक्ट झाले. या दोन्हीच्या आंतरशालेय स्पर्धा नेहरू स्टेडियम वर आहेत असे शाळेकडून सांगण्यात आले आणि परमोच्च आनंद झाला.एवढ्या मोठ्या स्टेडियमवर स्पर्धा आणि मला खेळायला मिळणार, माझी घोष रॅली तिथे होणार हे खूप भारी वाटत होते.मी इ. सातवीत होते.त्या वर्षी पुण्यातील साधारण २० शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यात आमच्या विमलाबाई गरवारे प्रशालेने प्रथम क्रमांकाची ढाल पटकावली.  
मग नेहरू स्टेडियम आपले वाटायला लागले. काही ना काही निमित्ताने सारखे येणे जाणे झाले. आताही जाऊ शकतो. पण त्यावेळची मजा,  त्यावेळचे कोच – प्रशिक्षक आता नाहीत याची खंत वाटतेच.

Leave a comment