माझे बालपण पुणे येथे औंध येथे गेले. १९६० मध्ये राहावयास गेलो. अद्यापही तेथे घर आहेच. त्यावेळी गावठाण व ग्रामीण समजला जाणारा हा भाग आता उच्चभृ गणला जातो. स्मरते ते जुने औंध.
* औंधगाव (बॉडीगेट) पोलिसलाइनमधीलछोट्यापडद्यावरीलजुनेचित्रपट*
फार पूर्वी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी महिन्यातून एक किंवा दोन चित्रपट दाखवले जायचे. रात्री ९ म्हणजे सुरू व्हायला १० वाजायचे. हे चित्रपट बॉडी गेट पटांगणावर उघड्या पडद्यावर व्हायचे. पोलिस हेड क्वार्टर म्हसोबा गेट होते. बॉडी गेट पोलिस स्टेशनला लागूनच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची निवासस्थाने होती. अधिकारी बंगले व छोटी बैठी घरे (चाळ) अशी बरेच घरे अर्थात बरीच कुटुंबे होती. तेव्हा औंध येथे आत्ता सारखी भाऊगर्दी नव्हती. खूप शांत म्हणून ओळखला जायचा हा भाग.
खरे तर हे चित्रपट पोलिस व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी असायचे. पण आम्ही औंध गावातील स्थानिक मंडळीही हे चित्रपट बघायला जायचो. मजा यायची. फिल्म यायला उशीर व्हायचा, मग technician ते रील जोडणार, प्रोजेक्टर adjust करणार, साऊंडची खरखर टेस्ट करणार मग चित्रपट सुरू होणार. तोही सलग नाही बघायला मिळणार. अर्धा तास झाला की मध्येच फिल्म तुटायची. ती ५,७ मिनिटे कल्ला, गडबड गोंधळ, शिट्या वाजणार. तीही मजा काही औरच. अशी ४ वेळा फिल्म ब्रेक होऊन ३ तासाचा चित्रपट ४ तास लागायचे संपायला. एक वाजायचा.
पण त्याकाळी समाधान व आनंद एवढाच की, हे चित्रपट अगदी चकटफू बघायला मिळायचे. ज्वार भाटा, जवानी दिवानी, बरसात, कच्चे धागे, मीलन, सावन भादो, पाठलाग, एक गाव बारा भानगडी यासारखे अनेक गाजलेले चित्रपट आम्ही बघितलेले आहेत. आता गेल्या त्या मजा,त्या काळातील आपली माणसे. कधीही परत न येण्यासाठी.
आज औंध सोडून ४० वर्षाहून अधिक वर्षे सरली,पण लिहिण्याच्या निमित्याने आठवणी मात्र ताज्या झाला.