21 मे, आंतर राष्ट्रीय चहा दिवस

*आंतरराष्ट्रीय चहा दिन *

अहो, कुणी कपबशा शेजारी धुताना किणकिण आवाज होत असला तरी चहा दिल्याचा आभास होतो आम्हाला. इतके चहाबाज आम्ही. तुम्ही म्हणाल “चहा’ हा काही विषय तरी आहे का लिहिण्यासारखा. पण मी म्हणते आहे. नक्कीच आहे.

मंडळी, चहा हा खरे तर नुसते पेय नाही तर ते उत्तम खाद्य आहे गप्पांच, आम्ही खरेच चहा पित नाही तर चहा सोबतच्या गप्पा खातो. वाफाळता चहाची काय मजा असते ना ती फक्त चहाप्रेमींनाच माहित.

चहा पिणे हे खरंतर सगळे घरात असल्याचे लक्षण आहे, म्हटले तर वावगे होणार नाही.

दारी आलेल्या पाहुण्यांना किमानपक्षी चहा दिल्याशिवाय पाठवायचंच नाही हा एक अलिखित नियम. मग ती व्यक्ती काम करणाऱ्या मावशी असोत नाहीतर कोणीही पाहुणा असो. प्रेम व घरोबा व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे चहा. काही नाही आले तरी चालेल पण मुलाला मुलीसाठी व मुलीला मुलासाठी किमानपक्षी चहा तरी करता आला पाहिजे, हे उत्तम आनंदी संसाराचे गमक आहे.

भांडणानंतर जोडीदाराने मुकाट्याने दिलेला चहा आपसूक भांडणं तर मिटवतोच मिटवतो, कारण हा चहा म्हणजे न बोलला गेलेला सॉरी शब्द असतो.

असे हे लोकप्रिय पेय चहा. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. चहा व चहापानामुळे मिळणारा निर्भेळ आनंद, एकरूप होणारी नाती हा खरोखर शैक्षणिक संशोथनाचा विषय होऊ शकतो.

इतक्याशा १५० मिलिग्रॅम चहाचे कपाने कोणाची डोकेदुखी थांबते, तर कोणाची कोटीकोटी व्यवसायातील व्यवहाराची उलाढाल, तडजोडी होतात, एवढेच नाही तर कित्येकांचे अनेक वर्षे व्यक्त न झालेले प्रेमही चहा भेटीत व्यक्त होते. असा हा बहाद्दर जडी, स्थळी, काष्ठी हवाहवासा चहा.

चहा कोणासोबत घेतला तर त्याची अधिक, अधिक आणि अधिक गोडी वाढवतोे , तर कधीतरी कोणाशिवाय एकांतात घ्यायचीच वेळ आली तर तणाव कमी करतो.

अनेकांना जेवू घालणारा सुप्रसिद्ध हॉटेलचा शेफ असो की पेशंटचा जीव वाचवणारा देवदूत नामवंत डॉक्टर असो , कितीही कार्यबाहुल्य असले तरी त्यांना कामाची उर्मी मिळते ती कपातील घोटभर चहातून, हे कबूल करावेच लागेल.

शेवटी काय,चहा पुराण घराघरातून इथून तिथून सारखेच!

भेटून बाहेर जाणार्‍या पाहुण्यांना चहाला पुन्हा एकदा यायचे आग्रहाचे निमंत्रण देऊन केलेला अच्छा बाय केला जातो तोच खरा पाहुणचार!

घरीच रहा, सुरक्षित रहा

चहाचा आस्वाद घेत रहा !

  • आपण जेवतो, खातो, पितो, कामे तर करतोच करतो. पण वाचनाची भूक दुर्लक्षित करतो. त्यासाठी माझा हा ब्लॉग.
  • मी लिहिणार रोज रोज मला आवडणारे तर मला कधी खटकणारेही.
  • कधी कधी रेसिपीज, तर कधी कविता.
  • या तर मग रोज भेटू यात.
  • मला आवडेल लिहायला आणि तुम्हा लोकांना वाचायला.

मी सौ.वीणा कुलकर्णी, पुणे

मी लिहिणार मनातले सारे काही. तेही तुमच्या, माझ्या व सर्वांच्या.

मी आत्तापर्यंत लिहिती नव्हते. पण ठरवले व्यक्त व्हायचे आता. म्हणूनच सामान्य भाषेतून लिखाणाची नुकतीच सुरुवात. भरपूर लोकसंग्रह जमा करण्याची मनस्वी आवड. जनसंपर्क नसेल तर जगणारा तो माणूस कसला ? म्हणूनच तर म्हटले ना वाचाल तर जगाल.