*संधीचे सोने *
आवडीचे अनेक चेहरे, आपली मंडळी लहान वयात सोडून गेल्याचे दुःख व आठवणी काढत काढत सकाळीच लागलेली तंद्री आरतीच्या बेलने घालवली. आरती कामाला आली होती.
डेटॉलने हात धुवत धुवत गप्पा सुरू. म्हणते कशी, अहो ताई बघा की, यंदाचे वर्षी काहीच अभ्यास केला नाहीं पोराने अगदी कमी मार्क पडले बघा 10 वीला.
कसलं ते क्लास ऑनलाईन का बिनलाईन बघा. त्याच्यावर त्याला काही अभ्यास कळत नव्ह्ता. गुरुजींनी शाळेत शिकवलेले कसे लक्षात राहते ना. म्हणजे 80 टक्के मार्क पाडणार पोरग फक्त 60 टक्के मार्क पडले बघा. जरा नाराज झाला होता. पण घातली समजूत त्याची.
त्याला म्हटले, अरे, असू दे,12 वी ला मिळतील की जरा जास्त मार्क. अहो ताई मला वाटले माझ्या बोलण्याने त्याचा थोडा आत्मविश्वास वाढेल, पण कसले काय पोराने आधीच योग्य तो निर्णय घेऊन ठेवला होता बघा.
अहो ताई, तो काय म्हणाला माहिती आहे का, अग आई, कुठे वर्ष घालवा, डिग्री घ्या, एवढे करून नोकरी लागेलच असे नाही. लागलीच तर ती कंपनीत. ती पण कमी पगाराची..आता या कोरोनातील महामारीने भल्याभल्यांना आहे ती नोकरी टिकवणे अवघड झालेय बघ. काय माहित कुठे भरवशाचे आहे ? सगळे धंदे पडू शकते बघ , पण दवाखाना, हॉस्पीटल, औषध पाणी कधीच बंद पडणार नाही. मी आपला पेशन्टची सेवा करता येईल असा एखादा कोर्स करतो. इतकं परफेक्ट पटले बघा मला. काय ते पोराचे झकास डोकं.
त्यानी brother nurse चां कोर्स करायचं पक्क केलं बघा. कोर्स झाला की लगेच नोकरी पक्की. कॉलेजला जाऊन माहिती घेऊन आला. आता कुटुंबाची चिंताच गेली बघा. तो खुश की मी खुश.
बघते किती पैसे जमा झाले माझ्या थैलीत ते. काही थोडे फार लागले फी भरण्यासाठी तर तुमच्यासारख्यांकडून घेईन उसंनवार
याला म्हणतात संधीचे सोने करणे. शोधा म्हणजे सापडेल हे समजले.काही वेळापूर्वी थोडेसे मरगळलेले मन हलकेसे प्रफुल्लित झाले हे मात्र खरे.
घरी रहा
सुरक्षित रहा
घाबरू नका सकारात्मक रहा.#