समानता : एक सामाजिक भान

  • समानता लिंग भेदातील*

एक वाईट खोड आहे पुस्तकांसारखी माणसे वाचायची.

सरकारी दवाखान्यात लस घेण्यासाठी सकाळीच गेले होते. आसपास सगळे सीनिअर सिटिझन. सगळे जोडीजोडीने. अर्थातच एकत्र जाणे हेच सोयीचे असते हे निर्विवाद सत्य आहे.

पण एक खटकले, खुर्च्यांची संख्या जसजशी कमी पडायला लागली तासतसे, खुर्चीवर आसनस्थ सर्व पुरुष व उभ्या राहिलेल्या सर्व बायका. स्त्रीने वयाची साठी ओलांडली तरी त्याग हा प्रथम स्त्रीनेच करायचा. गोष्ट छोटी होती पण खटकणारी होती चौकस बुध्दीला.

वृद्ध उभयतांची वये 2/5 वर्षांनी मागेपुढे. तरीही हा त्याग एकतर्फी का ? यात मात्र तिळमात्र अद्याप बदल नाही
असलाच तर अपवादात्मक, काही अंशीच !

आम्ही दरवर्षी 8 मार्चला हौसेने जागतिक महिला दिन साजरा करणारी मंडळी. पण खरेच पुरुष स्त्री समानता आली आहे का ?

हा भेदभाव अजूनही होतो. सार्वजनिक ठिकाणी अथवा घरात स्त्रीला आत्मसन्मान दिला तरच भेदभाव नष्ट झाला म्हणता येईल.

घरातील बारीक सारीक कामात किंवा धोरणात्मक कोणत्याही कौटुंबिक निर्णयात घरातील स्त्री पुरुष (नवरा, भाऊ वा वडील यापैकी कोणीही ) एकत्र येऊन जबाबदाऱ्या उचलणे, समूहाने निर्णय घेणे या कृती जेव्हा घडतील तेव्हाच स्त्री पुरुष समानता आली आहे किंवा स्त्री स्वतंत्र झाली असे म्हणता येईल.

जेव्हा पुरुष (नवरा, भाऊ व वडील)
घरातल्या स्त्रीला प्रेमानें (बायको, बहीण, वहिनी, आई) म्हणेल

  • आज मी तुला वाढतो तू माझ्याआधी जेव.
  • आज पहिला पेपर तू वाच, मी नंतर दुपारी सगळे काम झाले की वाचीन.
  • आजच्या दिवस तू लोळत पड, काही घाई नाही, मी सुरू करतो आपली रोजची कामे तोवर.

*ताई, वहिनी, आई सगळ्याआल्यावर मिळून एकत्र बोलू यात का ?

असे संवाद जेव्हा घराघरांतून घडतील तेव्हा स्त्री पुरुष समानता झाली म्हणता येईल. फक्त 8 मार्च या एकाच दिवशी गुलाब भेट देऊन महिला दिन साजरा करणे याचा काही उपयोग नाही.

मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
पण कुणी ? स्त्रीने, पुरुषाने, अख्ख्या कुटुंबाने की समाजाने ?

(टीप – हे सरसकट सगळ्यांना लागू नाही. काही अंशी बदल होतायत हे स्वागतार्ह आहे. )

वीणा कुलकर्णी
5.5.2021

Leave a comment