My recepie

लोणी काढणे : एक खानदानी संस्कार

५० वर्षापूर्वी लहान असताना मनावर बिंबवले जायचे जी मुलगी लग्न झाल्यावर लोणी काढू शकेल तीच खरी गृहिणी. आई, आज्जी, काकू अशा ज्येष्ठ स्त्रिया घरातील मुलीना हे काम आवर्जून सांगायच्या. आणि हे किचकट काम नको वाटायचे.

लोणी काढणे हे काम म्हटले तर महत्वाचे, म्हटले तर क्षुल्लक आहे. प्रपंचात लोणी काढण्याचा गृहिणी शब्दाशी अर्थाअर्थी संबंध नाही,असे वाटते. हे काम ज्याच्या त्याच्या काळ, काम वेगावर अवलंबून असते हे खरे.

तरीही घराघरात असणारी पद्धत सर्वसाधारण अशीच ;-

रोज लागणारे दूध सकाळी एकदा तापवले की त्याच्यावर साधारण २ तासांनी येणारा सायीचा थर विरजण करण्यासाठी एका स्वच्छ काचेच्या किंवा स्टीलच्या वाडग्यात काढून घेणे. दुसऱ्यांदा जेव्हा केव्हा दूध तापवले जाते तेव्हा पुन्हा एकदा अशीच साय त्याच वाडग्यात काढून घेणे.. हे भांडे रोज फ्रिजमध्ये ठेवणे. चार एक दिवसांनी हे सायीचे वाडगे भरले की रात्री आंबट ताकाचा चमचा विरजण म्हणून एकच दिशेने गोल फिरवून हे भांडे रात्रभर बाहेर ठेवणे. दुसऱ्या दिवशी रवी किंवा मिक्सर वर घुसळून त्याचे ता क करणे. ताक करतेवेळी घुसळतानाच लोण्याचा गोळा वर येतो. हा गोळा दिसला रे दिसला की सकाळी सकाळी मन प्रसन्न होते.

(टीप -. असे ताजे घरचे लोणी काढले की, ब्रेड सँडविच, भाजणीचे थालीपीठ किंवा लोणी डोसा घरी आवर्जून करावा, लज्जत काही औरच.)

वीणा कुलकर्णी

घरचे लोणी

आठवणीतील पुणे : ग्राहक पेठ

ग्राहक पेठ : खरेदीचे एक आगळे वेगळे आकर्षण

पूर्वी दर महिन्यास लागणारा किराणा माल घराजवळच्या वाण्याकडूनच घ्यायची प्रथा होती. आधी कागदावर यादी लिहायची, मग ती आम्ही मुलांनी त्याच्याकडे नेऊन द्यायची. अशी घराघरातून एक प्रथा होती. हे सामान महिनाभर पुरवायचे गृहिणीचे कौशल्य. संपले व परत लागले तर शक्यतो दुकानातून आणायचे नाही. उसने घ्यायचे शेजारच्या घरातून व आपले सामान आले की ते परत करायचे. एक भांडे दाणे, एक पातेले कणीक व यासारखे काहीही. पण संकोच नसायचा कधीच. त्यामध्ये एक प्रेम, जिव्हाळा असायचा.

हे सगळे सांगायचे कारण म्हणजे साधारण सन 1974-1975 च्या सुमारास “ग्राहक पेठ” या पुणेकरांना आकर्षित करणाऱ्या डिपार्टमेंटल store चा पुण्यात उगम झाला व हे किराणा सामान यादी प्रकरण कमी झाले.

निवडलेले, उत्तम क्वालिटी असलेले, वाज्जवी दरातील सुबक पॅकिंग केलेले प्लास्टिक पिशव्यांमधील किराणा माल ग्राहकांना एकच ठिकाणी उपलब्ध होऊ लागला. प्रत्येक मालाचे दालन वेगळे. आपल्याला जे पाहिजे ते ते सर्व उत्पादन तारीख व किंमत बघून घ्यायचे.

एकत्र शॉपिंग करण्यासाठी
प्रवेशदाराशी विविध रंगांच्या बास्केट. ही बास्केट घ्यायची व पाहिजे असेल ते सर्व बास्केटमध्ये घ्यायचे. हा एक नवीन व चांगला प्रकार होता त्यावेळी पुणेकरांसाठी.

दैंनदिन लागणारा उत्तम निवडक किराणा माल अगदी स्टेशनरी वस्तू, मराठी भावगीतांच्यां, बालगीतांच्या
सीडी सगळे सगळे बघून घ्यायचे व मनासारख्या तृप्त खरेदीचा आनंद मिळवून दिमाखात बाहेर पडायचे. अशा पद्धतीने खरेदीची नवीन कल्पना होती, खूप मजा यायची.

त्यानंतर बाहेर आले की ताजी व दर्जेदार फळे, वृंदाज बेकरी चे टेस्टी खाद्यपदार्थ हा रविवारचा नित्यक्रम ठरलेला असायचा. आजही अनेक घरात हीच प्रथा आहे. एवढेच काय गणपतीच्य दिवसात घरासाठी गणपती आणायचा तोही अगदी ग्राहक
पेठेतूनच.

साठवणुकीचा वर्षाचा तांदूळ, डाळी इत्यादी, ग्राहकहित हे वार्षिक मासिक, कोणताही कार्यक्रम असो त्यासाठी लागणारी भेट वस्तू, शालेय वस्तूंची खरेदी, उपवास सामान हे ग्राहक पेठेतून खरेदी करायचे असा अलिखित कौटुंबिक नियमच जणू.

त्यामुळे ग्राहक पेठ व ग्राहक यांची नाळ कधीच तुटणार नाही. घराघरांतून खरेदी करणारी आज चौथी पिढी वावरतेय त्यांचे प्रांगणात.

एकंदरीत तेथील व्यवस्थापन, स्वच्छता, सचोटी, कर्मचाऱ्यांची सेवा या गुणावरच आजही ग्राहक पेठ तितक्याच रुबाबात उभी आहे आमच्या सोयीसाठी.

आमच्यासाठी ग्राहक पेठ ही केवळ shopee नसून कौटुंबिक ऋणानुबंध जपणारी एक शृंखला व सेवासंस्था आहे. अशा या ग्राहक पेठेचा आम्हा अस्सल व चिकित्सक पुणेकरांना रास्त अभिमान का बरे नसावा ?

वीणा कुलकर्णी
8.6.2021

काळाची गरज म्हणून पाहू यात का ?

हे तुम्हाला मान्य आहे का ? : इच्छामरण

मध्यंतरी खूप विषय गाजला होता तो म्हणजे इच्छामरण. बराच उहापोह करण्यांत आला होता. विषय आहेच असा चिंतन करण्यासारखं.

दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत असा.

सर्व काही आहे, सुखसमृद्धी आहे पण माझ्याकडे आरोग्य नाही, मला जर्जर होऊन जगायचे नाही. मी बरा होईन पण भार होऊन किती आयुष्य जगू, निरर्थक कसा जगू ? या विवंचनेत आहे.

शरीर धडधाकट आहे. श्रम करण्याची ताकद आहे तर मला काम नाही. मी बेकार आहे.मी कंटाळलो या अशा जिण्याला. मी स्वतः आनंदी व खंबीर नाही तर इतरांना कोणाला कसा आनंदी ठेवणार, मी बोझ आहे का ? मी आत्महत्या केली तर अधिक बरे का ? मी नकारार्थी का झालोय ?

वरील दोन वेगवेगळे प्रश्न दिसतात. यासारखे अनेक प्रश्नांची वेगवेगळी उदाहरणे दिसतील आसपास .

दुसरा प्रश्न हा प्रश्न नाहीच खरेतर. त्यावर उपाय आहेत.
पण प्रश्न 1 मध्ये विचार करण्यासारखे आहे .

इच्छामरण कायदा हवाच हवा.
कारण ज्याला निष्क्रिय व गलितगात्र अवस्थेत जगून आपल्या माणसांना शारीरिक, आर्थिक त्रास देऊ नये असे आंतरिक वाटते. अशा जगण्यात स्वारस्य नसते. त्यांची पुढची पिढी निकोप ठेवण्यात पैसा व श्रम खर्च झाल्यास फायद्याचे आहे.

उलट असे परावलंबी व भार होऊन जगण्याचा त्याला त्रासच जास्त होतो.
मनुष्यबळ नसल्याने बंद घरात एकाकी मृत्यु आल्याची अनेक उदाहरणे घडत आहेत सध्या. त्यापेक्षा इच्छामरण स्वाभिमानी माणूस स्वीकारू शकतो. हे मरण पण नैसर्गिक समजावे समाजाने. तरच कायदा लागू होईल कोणतेही नवीन बदल स्वीकारताना विरोध होतोच.

एक महत्वाचे हा कायदा करताना पळवाटा नको. नाहीतर मरण स्वस्त होईल व नातेवाईकांनाच भांडवल मिळेल या कायद्याचे.
कारण आपल्याकडे कोणताही कायदा पाहिला तर गैरफायदा घेणारेही खूप आहेत.
जसे : महिला लैंगिक शोषण कायदा
हुंडा प्रतिबंध कायदा

खरे खोटे करण्यात जिन्दगी खलास होते.

विधितज्ञ, डॉक्टर, न्यायाधीश यांचे काम जिकिरीचे आहे याप्रकरणी.

कायदा व शांतता पालन करून गोपनीयता ठेवून हे अमलात आणता येईल का पाहणे आता नितांत गरजेचे आहे.

वीणा कुलकर्णी

My recepies

माझी पाक कृती -१

डिंक लाडू ची चवच भारी
सर्वांसाठी पौष्टिक न्याहारी !!

लहान थोर सगळ्यांचा आवडता खाऊ
डिंक लाडू

बिनधास्त खा अन् सुदृढ बना

जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल

पुणे आणि अप्पा बळवंत चौक

आज २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन.
खूप खूप शुभेच्छा !

पुस्तक खरेदी म्हटल की अप्पा बळवंत चौक.

५० वर्षांपूर्वी शालेय पुस्तके खरेदी करताना मी गर्दीत चुकेन म्हणून आई दादा माझे बोट धरत असे. आत्ता त्याच भीतीने माझ्या बोटाने, जेव्हा नात पुस्तके खरेदी करताना मी नातीचा हात घट्ट पकडते तेव्हा हसू येते. असा हा अप्पा बळवंत चौकाचा पिढीजात संबंध.

उज्ज्वल ग्रंथ भांडार हे माझे आवडते पुस्तक भांडार. तशी अनमोल, शर्मा बुक,छान छान विशेष काही नवीन घ्यायचे असेल तर venus ट्रेडर्स, कायदेविषयक पुस्तके अजित लॉ डेपो असे सगळे ठरलेले चौकटीत.

जेवायला कमी असले तरी चालेल,पण पुस्तक खरेदीत हावरटपणा करणारी मी. त्यामुळे चुकला फकीर मशिदीत तसे मी अप्पा बळवंत चौकात पडीक.

मैत्रिणी कपड्यांचा पावसाळी sale कधी लागतो वाट पाहत असत. त्यावेळी मी पुस्तके ६०:४० सवलतीत कुठे मिळतात त्याचा मागोवा घ्यायची.

एकंदरीत काय माझ्यासारख्या वाचनवेड्या लोकांना अप्पा बळवंत चौक म्हणजे पुस्तकालय नसून आधुनिक शब्दातील मॉल म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

किती विद्वानांच्या पिढ्या घडविल्या या अप्पा बळवंत चौकाने हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल, हे पुणेकरांना नक्कीच पटेल.

घरी रहा
सुरक्षित रहा
आणि सतत वाचत रहा.जा

अशीही एक संधी

*संधीचे सोने *

आवडीचे अनेक चेहरे, आपली मंडळी लहान वयात सोडून गेल्याचे दुःख व आठवणी काढत काढत सकाळीच लागलेली तंद्री आरतीच्या बेलने घालवली. आरती कामाला आली होती.

डेटॉलने हात धुवत धुवत गप्पा सुरू. म्हणते कशी, अहो ताई बघा की, यंदाचे वर्षी काहीच अभ्यास केला नाहीं पोराने अगदी कमी मार्क पडले बघा 10 वीला.

कसलं ते क्लास ऑनलाईन का बिनलाईन बघा. त्याच्यावर त्याला काही अभ्यास कळत नव्ह्ता. गुरुजींनी शाळेत शिकवलेले कसे लक्षात राहते ना. म्हणजे 80 टक्के मार्क पाडणार पोरग फक्त 60 टक्के मार्क पडले बघा. जरा नाराज झाला होता. पण घातली समजूत त्याची.

त्याला म्हटले, अरे, असू दे,12 वी ला मिळतील की जरा जास्त मार्क. अहो ताई मला वाटले माझ्या बोलण्याने त्याचा थोडा आत्मविश्वास वाढेल, पण कसले काय पोराने आधीच योग्य तो निर्णय घेऊन ठेवला होता बघा.

अहो ताई, तो काय म्हणाला माहिती आहे का, अग आई, कुठे वर्ष घालवा, डिग्री घ्या, एवढे करून नोकरी लागेलच असे नाही. लागलीच तर ती कंपनीत. ती पण कमी पगाराची..आता या कोरोनातील महामारीने भल्याभल्यांना आहे ती नोकरी टिकवणे अवघड झालेय बघ. काय माहित कुठे भरवशाचे आहे ? सगळे धंदे पडू शकते बघ , पण दवाखाना, हॉस्पीटल, औषध पाणी कधीच बंद पडणार नाही. मी आपला पेशन्टची सेवा करता येईल असा एखादा कोर्स करतो. इतकं परफेक्ट पटले बघा मला. काय ते पोराचे झकास डोकं.

त्यानी brother nurse चां कोर्स करायचं पक्क केलं बघा. कोर्स झाला की लगेच नोकरी पक्की. कॉलेजला जाऊन माहिती घेऊन आला. आता कुटुंबाची चिंताच गेली बघा. तो खुश की मी खुश.

बघते किती पैसे जमा झाले माझ्या थैलीत ते. काही थोडे फार लागले फी भरण्यासाठी तर तुमच्यासारख्यांकडून घेईन उसंनवार

याला म्हणतात संधीचे सोने करणे. शोधा म्हणजे सापडेल हे समजले.काही वेळापूर्वी थोडेसे मरगळलेले मन हलकेसे प्रफुल्लित झाले हे मात्र खरे.

घरी रहा

सुरक्षित रहा
घाबरू नका सकारात्मक रहा.#

समानता : एक सामाजिक भान

  • समानता लिंग भेदातील*

एक वाईट खोड आहे पुस्तकांसारखी माणसे वाचायची.

सरकारी दवाखान्यात लस घेण्यासाठी सकाळीच गेले होते. आसपास सगळे सीनिअर सिटिझन. सगळे जोडीजोडीने. अर्थातच एकत्र जाणे हेच सोयीचे असते हे निर्विवाद सत्य आहे.

पण एक खटकले, खुर्च्यांची संख्या जसजशी कमी पडायला लागली तासतसे, खुर्चीवर आसनस्थ सर्व पुरुष व उभ्या राहिलेल्या सर्व बायका. स्त्रीने वयाची साठी ओलांडली तरी त्याग हा प्रथम स्त्रीनेच करायचा. गोष्ट छोटी होती पण खटकणारी होती चौकस बुध्दीला.

वृद्ध उभयतांची वये 2/5 वर्षांनी मागेपुढे. तरीही हा त्याग एकतर्फी का ? यात मात्र तिळमात्र अद्याप बदल नाही
असलाच तर अपवादात्मक, काही अंशीच !

आम्ही दरवर्षी 8 मार्चला हौसेने जागतिक महिला दिन साजरा करणारी मंडळी. पण खरेच पुरुष स्त्री समानता आली आहे का ?

हा भेदभाव अजूनही होतो. सार्वजनिक ठिकाणी अथवा घरात स्त्रीला आत्मसन्मान दिला तरच भेदभाव नष्ट झाला म्हणता येईल.

घरातील बारीक सारीक कामात किंवा धोरणात्मक कोणत्याही कौटुंबिक निर्णयात घरातील स्त्री पुरुष (नवरा, भाऊ वा वडील यापैकी कोणीही ) एकत्र येऊन जबाबदाऱ्या उचलणे, समूहाने निर्णय घेणे या कृती जेव्हा घडतील तेव्हाच स्त्री पुरुष समानता आली आहे किंवा स्त्री स्वतंत्र झाली असे म्हणता येईल.

जेव्हा पुरुष (नवरा, भाऊ व वडील)
घरातल्या स्त्रीला प्रेमानें (बायको, बहीण, वहिनी, आई) म्हणेल

  • आज मी तुला वाढतो तू माझ्याआधी जेव.
  • आज पहिला पेपर तू वाच, मी नंतर दुपारी सगळे काम झाले की वाचीन.
  • आजच्या दिवस तू लोळत पड, काही घाई नाही, मी सुरू करतो आपली रोजची कामे तोवर.

*ताई, वहिनी, आई सगळ्याआल्यावर मिळून एकत्र बोलू यात का ?

असे संवाद जेव्हा घराघरांतून घडतील तेव्हा स्त्री पुरुष समानता झाली म्हणता येईल. फक्त 8 मार्च या एकाच दिवशी गुलाब भेट देऊन महिला दिन साजरा करणे याचा काही उपयोग नाही.

मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
पण कुणी ? स्त्रीने, पुरुषाने, अख्ख्या कुटुंबाने की समाजाने ?

(टीप – हे सरसकट सगळ्यांना लागू नाही. काही अंशी बदल होतायत हे स्वागतार्ह आहे. )

वीणा कुलकर्णी
5.5.2021

काळजी घ्या स्वतःची व सगळ्यांची.

काय परिस्थिती उद्भवली आहे, काही घरात आई बाबा पोरांशिवाय पोरके झाले आहेत, तर काही घरात पोरे आई बाबा शिवाय पोरकी झालीत. काय ही नियतीची क्रूर थट्टा? कधी संपणार हा जीवन मरणाचा खेळ ?

“जन्माला येतानाच प्रत्येकजण नशीब घेऊन येतो , प्रत्येकाचे श्वास ठरलेले असतात”
या शब्दात केलेले सांत्वन खरोखर पुरेसे होईल का या सगळ्यांसाठी ?

कोणी जात्यात तर कोणी सुपात, भांबावलेली अवस्था झालीय समाजातच नव्हे तर प्रत्येक घराघरात.

वैद्यकीय सेवा सुविधा आता तरी सर्वांना वेळेत उपलब्ध होतील का ?

Stay safe n healthy
Stay @home

कविता माझ्या

बरेचवेळा त्रास होतो कोडी माझी सुटत नाहीत म्हणून. ही मलाच नाही तर अनेकांना पडतात बर का . बघा तुमच्याही मनात ही कोडी घर करतात का ?